आज दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत वर्दे येथे महावितरण आणि दाभोलकर सोलार अँड ॲग्रोटेक इंडस्ट्रीज प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट सोलार कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. ग्रामीण भागातील नागरिकांना सोलार ऊर्जेविषयी सविस्तर माहिती मिळावी तसेच शासनाच्या स्मार्ट सोलार योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत महावितरणचे विभागीय उपअभियंता श्री. राजेंद्र कामठे साहेब यांनी उपस्थित ग्रामस्थांना स्मार्ट सोलार योजनेबाबत सखोल मार्गदर्शनकेले. सोलार रूफटॉप प्रणालीचे फायदे, शासनाकडून मिळणारे अनुदान, अर्ज करण्याची प्रक्रिया तसेच सोलारमुळे वीजबिलात होणारी लक्षणीय बचत याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
यावेळी श्री. कामठे साहेब यांनी सोलार ऊर्जेमुळे पर्यावरणास होणाऱ्या फायद्यांविषयी विशेष भर देत मार्गदर्शन केले. सोलार ऊर्जेच्या वापरामुळे वायूप्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होते, कार्बन उत्सर्जन कमी होते, कोळसा व इतर जीवाश्म इंधनांवरील अवलंबन घटते तसेच स्वच्छ व हरित ऊर्जेमुळे भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित व शाश्वत पर्यावरण निर्माण होते, असे त्यांनी ठळकपणे सांगितले.
दाभोलकर सोलार अँड ॲग्रोटेक इंडस्ट्रीज प्रा. लि. यांच्याकडून सोलार प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक कागदपत्रे, तांत्रिक प्रक्रिया तसेच प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी याविषयी माहिती देण्यात आली. नागरिकांच्या विविध शंकांचे समाधान करून सोलार योजनेबाबत असलेले गैरसमज दूर करण्यात आले.
कार्यशाळेत कडावल सेक्शनचे सेक्शन ऑफिसर यांनी नवीन घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन वीज मीटर घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नवीन घरकुलासाठी आवश्यक अर्ज प्रक्रिया, लागणारी कागदपत्रे तसेच मीटर बसविण्याची संपूर्ण कार्यपद्धती त्यांनी उपस्थित लाभार्थ्यांना समजावून सांगितली.
यावेळी पणदूर सेक्शन ऑफिसर यांचीही उपस्थिती लाभली. स्मार्ट सोलार योजनेमुळे ग्रामीण भागात स्वयंपूर्णता वाढून पर्यावरणपूरक आणि किफायतशीर ऊर्जेचा वापर अधिक प्रमाणात होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या कार्यशाळेस ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी कार्यशाळेत दिलेल्या मार्गदर्शनाचा लाभ घेत सोलार योजनेबाबत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
